Monday, July 28, 2008

काय समजलास, बाळीशा!

"अरे, अरे, भात असा चांगला कालवून घ्यावा बाळीशा! हे काय, भात एकीकडं आणि वरण एकीकडं! हं, आणि वरण घे थोडसं आणखी. आश्शी! लिंबू पिळलास का? अरे, चवीनं खायला शिकावं बाळीशा! लिंबाची बी काढून टाक ती भातातली, कडू लागेल नाहीतर. आता लहानलहान घास घे. घाई करू नकोस. हं. जमलं बघ आता. कोशिंबीर हवीय का आणखी? मग? कुठली कविता म्हणत होतास मगाशी? काय? जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत? हम्म. म्हणजे या जगातले सगळे लोक तुझी भावंडे आहेत? काय रे, तुझ्या बापूसाला दुसरा काही उद्योग होता की नाही? आं? आणि बापूसाचे जाऊ दे तुझ्या. असतो एकेकाचा दम, पण तुझ्या आयशीचा तर विचार करशील? खुळा की काय तू बाळीशा? म्हणे भावंडे आहेत! काय? काय ते? हां, हां, या पंक्तीतले म्हणतो आहेस होय! आता आलं ध्यानात. म्हणजे ही पंगत म्हणजे रस्त्यात पसरलेली एक गाय आहे आणि आपण सगळी तिच्या आचळांना लुचणारी वासरे आहोत असं म्हण की. बाळीशा, कसं होणार रे तुझं या जगात? अरे, अरे, कोंबडीचे एक पिल्लूदेखील दुसऱ्यासारखे नसते रे! आणि तुला जरा चार लोक आसपास जमले की सगळे भाऊ आणि बहीणी वाटायला लागतात! त्याचं काय आहे बाळीशा, मराठी माणूस एकंदर भाबडाच. काही म्हण तू. जरा कुठे चार लोकांच्या ओळखी झाल्या की लागले लगेच हुंदके द्यायला. 'माझं माहेरच मला सापडलं गं बाई', 'कशे गं मला माझे सोयरे मिळाले, नाहीतर एवढ्या मोठ्या जगात मी कुठे गं बाई गेले असते? ' नाही, नाही बाप्यामाणसांचीही हीच गत असते बाळीशा. अरे, कुणाला कशाचा पत्ता असत नाही आणि लोकांना जन्मजन्मांतरीची नाती सापडतात, आहेस कुठं तू? अरे, असं कसं असेल जगात बाळीशा? आता हे बघ, अळूच्या भाजीला हातपण लावला नाहीस तू आणि तो समोरचा ढेरपोट्या बघ कसा अळू भुरकतोय ते! अरे, असं कमीजास्त चालायचंच समाजात! नाही का? मगाशी काय तुझा देस का कुठला राग सुरू झाला आणि ते काका पुंगी वाजवल्यासारखे डोलायला लागले. आणि तू? बाळीशा, त्या रागातल्या तानांइतक्याच मोठ्या आयायाया अशा जांभया द्यायला लागलास! ते मगाशी कुणीतरी अस्वलं की मगरी की पाली यांच्यावर अगदी भरभरून बोलत होतं आणि इथं तो केसाळ वास आठवून मला ढवळून आलं. आणि ते काका? सांगत होते बघ ते आपल्या लहानपणाच्या आठवणी! आणि हे फिरकीकर मला इकडे म्हणतात कसे! म्हणे यांना कान्होपात्रेचा अभंग म्हणून दाखवा हो कुणी. म्हटलं कुठला बुवा? तर म्हणे 'नको देवराया अंत असा पाहू.. ' खि खि खि... असे कसे रे सगळे लगेच भाऊ आणि बहिणी होतील? आता बघ, मटणाचा लालभडक रस्सा.. हां, हां लाळ आवर आधी तोंडातली - तर रश्श्याचं नुसतं नाव काढलं तर बाळंत व्हायला तयार होशील तू, आणि तो कवनउधार? 'प्राण्यांची प्रेतं, प्राण्यांची प्रेतं' म्हणून गोमगाला कर सुटेल बघ! अरे हे चालायचंच! एका पंगतीला जेवायला बसलास म्हणून लगेच एकमेकाच्या गळ्यात पडायला नको काही! काय?
लांगूलचालन होय? कुणी सांगितला तुला हा शब्द? म्हणजे असं बघ बाळीशा, आता तू या पंगतीत जेवायला बसलायस की नाही, मग इथल्या यजमानांना म्हणायचं, की धनी, काय तुमचं करवतकाठी धोतर, काय तुमच्या उपरण्याचा थाट आणि तुमच्या गुटगुटीत तनुची तर दृष्ट काढून टाकायला पाहिजे हो! हो, अहो, सगळ्या नजरा काही चांगल्या नसतात! तर हे झालं इथलं! आता पलीकडे गेलास की तिथल्या यजमानांना म्हणायचं, व्वा! सूट असावा तर असा! आणि टायचा सामोसा बांधायला तर खुद्द लॉर्ड माउंटब्याटन तुमच्याकडूनच शिकला असावा. हंगाश्शी! आता आलं बघ तुझ्या ध्यानात. असं जिथं जाईल तिथं 'सजनाकी वारी वारी जाऊंगी मैं, तूही मेरा यार है' असं म्हणत रहायचं. कशासाठी? आता ते मी काय सांगू बाबा? तुला डोक्यावर पान पडल्यावर 'आभाळ पडतंय, पळा पळा' म्हणणाऱ्या सशाची गोष्ट माहिती आहे ना बाळीशा? बास... बास. लाज? अरे यात लाज वाटण्यासारखं काय आहे बाळीशा? तू ना, अजून अडाणी तो अडाणीच राहिलास बाळीशा! इतके दिवस माझ्याबरोबर राहून काही म्हणजे काही शिकला नाहीस! अरे जगात अशी लाजबीज बाळगून चालत नाही बाळीशा! उलट गावगन्ना करून चारचौघात असं सांगायचं असतं - मी ना, मी जिथ्थं जाईल तिथ्थं त्यांचा त्यांचा उदोउदो करतो. आं? काय म्हणालास? करते? हं... बरंच बारीक लक्ष असतं हो तुझं. शिक, शिक जरा त्या सपकसुप्रियेकडून... कातडी गेंड्याची असावी लागती बाबा. शिकशील हळूहळू...
आणि हे काय? तू कुठे निघालास मध्येच उठून? काय? तो पंगतीतनं कुणीतरी उठून चाललाय त्याला थांबवायला पाहिजे म्हणतोस? वेडा रे वेडा! अरे, असं कुणी कुठून उठून जात नसतं बाळीशा! अधनंमधनं असं म्हणत रहायचं असतं, आता कंटाळा आला, आता निवृत्तच होतो... मग कुणीतरी धावत येतो आणि म्हणतो, अरे अरे अरे, तुम्ही नसाल पंगतीत तर काय मजा? असं करू नका बुवा. या बरं परत. पण पुढच्या बुधवारी मी जातो म्हणणार आहे, तेंव्हा मला आडवायला यायचं हं. मग उंटावरनं झुलत झुलत, मुजरे स्वीकारत परत यायचं असतं बाळीशा. अरे, अशा फुकटच्या जेवणावळी चुकवून चालेल का? बाकीच्यांचं जाऊ दे, यजमान स्वतःच मगाशी पंगतीत म्हणून गेले बघ. मंडळी, ही शेवटची पंगत, इथून पुढं जमलं तर चालवीन ही जेवणावळ, नाहीतर बंद करून टाकीन. दुनिया गेली बा... अम्म अम्म.. असो. अजून बच्चा आहेस तू बाळीशा. वेवहार म्हणजे काय हे कळणार नाही तुला इतक्यात. अरे, जगात रहायचं तर हे सगळं करायला लागतं! काय समजलास?

No comments: